जळगाव | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका निमंत्रण पत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. आज रोजी पर्यंत जळगाव जिल्ह्यातील २ लाख २० हजार घरापर्यंत तर जळगाव शहरात १लाख ३० हजार घरापर्यंत निमंत्रण पोहचवीण्यात आले.
या निमंत्रण पत्रकातील संदेशात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची घोषणा केलेली असून येत्या १३ मे रोजी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यादिवशी आपण व आपल्या कुटुंबीयांनी मतदान करण्यास अवश्य यावे, त्यासाठीच हे निमंत्रण पाठवित आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य ज्यांची जळगाव किंवा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे आहेत, तथापि शिक्षण व नोकरी निमित्ताने अन्य ठिकाणी राहत असतील, तर ते जिथे काम करत असतील तेथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. तसेच दिनांक ११ मे आणि १२ मे रोजी शनिवार आणि रविवार आहे, त्यामुळे त्यांनाही लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी बोलावून त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित कराल.

मतदानाला येतांना निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, वाहन चालक परवाना, फोटो असलेले बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणावे. यामुळे आपणांस आपल्या मतदान केंद्राचा पत्ता व मतदार यादीतील आपला अनुक्रमांक याची माहिती होईल व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपले मतदान सुलभ होईल. मात्र ही चिठ्ठी ओळखीचा पुरावा म्हणून गृहीत धरता येणार नाही.
केंद्रावर आपली गैरसोय होणार नाही, यासाठी मी व माझ्या सहकाऱ्यांनी पुरेशी काळजी घेतली आहे. आपल्या कुटुंबात दिव्यांग बांधव अथवा जेष्ठ नागरिक असल्यास त्यांचेसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे. आपल्यासोबत लहान मूले असल्यास त्यांच्यासाठी पाळणाघराची सुविधा केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य केंद्र, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी आम्ही आपली वाट पहात आहोत.
या पत्राचे आपल्या परिवारासह सामुहिक वाचन करून त्याचा व्हिडीओ व्हॉटसअप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच मतदानाविषयी आपणास नागरिकांना काही अडचण असल्यास 1950 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावयास सांगण्यात आले आहे.
