Headlines
Home » महाराष्ट्र » शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाड मध्ये क्रॅश

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाड मध्ये क्रॅश

रायगड | दि.३( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांना सभेला नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लॅंड होतांना रायगड जिल्ह्यातील महाड येथे कोसळले. अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. हेलिकॉप्टरमधील पायलट व सहाय्यक दोघे सुरक्षित आहेत.

सविस्तर वृत्त असे की, सुषमा अंधारे यांची काल महाड येथे सभा होती. सभा उशिरापर्यंत चालल्याने त्या महाडमध्येच थांबल्या होत्या. आज महाडहून त्या बारामती येथे महिला मेळाव्याला व तेथून पुढे नियोजित दौऱ्यावर जाणार होत्या. त्यामुळे सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते.

हेलिकॉप्टरने हवेतच तीन चार घिरट्या घेऊन जमिनीवर उतरत (लॅंड) असताना अचानक त्याचा तोल गेल्यासारखे हेलकावे घेत खाली कोसळले. त्यावेळी घटनास्थळी धूळीचे प्रचंड लोट उठले. जवळपास पाच ते सात मिनीटांनी हे धूळीचे लोट शांत झाले. हेलिकॉप्टर मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहीती आहे.

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान सुषमा अंधारे ह्या जिल्ह्याच्या पुढील नियोजित दौऱ्यासाठी कारमधून रवाना झाल्या.

कोण आहेत ह्या सुषमा अंधारे …?
सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या २०२२ च्या दसरा मेळाव्यात त्यांनी दमदार भाषण केले होते. तेव्हा पासून त्या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या. आपल्या प्रचंड अभ्यासू तसेच आक्रमक भाषण शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहे. सध्या सुषमा अंधारे ह्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!