सांगली | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ करीता ज्या मतदारसंघात पहिल्या आणि दूसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते, त्या-त्या मतदार संघात झालेल्या मतदानाची टक्केवारी घोषित करण्यात आली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने नव्याने पुन्हा मतदानाची टक्केवारी घोषित केली आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ११ दिवसांनी तर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी तीन दिवसांनी दिली होती. निवडणूक आयोगाने अधिकृत घोषित केलेल्या नव्या टक्केवारीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्वच मतदारसंघात ६ ते ७ टक्के मतदानात वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा, हे आम्ही म्हणतो त्याला एकाप्रकारे दुजोरा देण्याचाच हा प्रकार आहे. निवडणूक आयोग मोदी-शहांच्या पकडीत गुदमरलेला आहे. या आधी ईव्हीएम यंत्रणा, आचारसंहिता उल्लंघनाची प्रकरणं, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय, त्यात आता आणखी एकाची भर पडली असून पहिल्या दोन टप्प्यात साधारण ६ ते ७ टक्के मतं अचानक वाढल्याचे दाखवत आहेत.
नांदेड येथे मतदान संपले तेव्हा तेथे ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात अर्धा किंवा एक टक्का फरक दुसऱ्या दिवसापर्यंत पडू शकतो. पण ५२ टक्क्यांचे चक्क ६२ टक्के कसे होऊ शकतात ! देशभरात पहिल्या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान झाले तिथे याच पद्धतीचे आकडे आयोगाने जाहीर केले असून ही धक्कादायक बाब आहे. मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी ११ दिवस लागतात का? असा सवालही राऊत यांनी केला.
पत्रकारांसोबत बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, हे डीजिटल इंडिया आहे. किती टक्के मतदान झाले हे आतापर्यंत संध्याकाळी आम्हाला समजत होते. त्यानुसार आकडेही आले. पण आश्चर्य असे की फक्त नागपूरमध्ये अर्धा टक्के मतदान कमी झाल्याचे दाखवत असून हा एक वेगळाच घोळ आहे. नागपूर सोडून सगळीकडे ७ टक्के मतदान वाढले आहे. हे मतदान वाढले कसे? वाढलेले मतदान कुठे गेले? कुणी केले? हे जाहीर करायला ११ दिवस का लागले? हा देशाला पडलेला प्रश्न आहे.
भारताचा निवडणूक आयोग हा आता भारताचा राहिला नसून ते मोदी-शहा या कारस्थानी राजकारण्याच्या हातातले बाहुले झाले आहे का? असा सवाल करत खासदार राऊत पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील निवडणुका लष्कराच्या हातात असतात. कुठल्या मतदारसंघात कुणी जिंकायचे, कोणत्या पक्षाला आघाडी आणि कोणत्या पक्षाला पिछाडीवर ठेवायचे हे लष्कर ठरवते. त्याप्रमाणे आपल्या देशातील निवडणूक आयोगाने जो घोळ सुरू केला त्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती आहे, अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली.
यावेळी लोकसभेसाठी मतदान कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष अनेक मतदारसंघात पिछाडीवर पडला अशा प्रकारची राजकीय विश्लेषणं आल्यानंतर ११ दिवसांनी त्या-त्या मतदारसंघातील मतदानाची नवीन आकडेवारी समोर आली. त्यात कुठे ११ टक्के, तर कुठे ७ टक्के वाढ झाली. हे वाढलेले मतदान आले कुठून? मतपत्रिकेवर मतदान होत होते तेव्हाही सायंकाळी ७ पर्यंत किती मतदान झाले याचे तंतोतंत आकडे यायचे. यावेळी डीजिटल इंडिया करूनही मतदानाच्या दिवशी सायंकाळी आलेले आकडे आणि ११ दिवसांनी जाहीर झालेले आकडे वेगळे आहेत. जगात कुठेही मतदानाच्या ११ दिवसानंतर टक्केवारी जाहीर होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली असून ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.
