कोल्हापुर | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज शहाजी ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात पार पडली. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष मा. शरद पवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ह्या सभेस प्रचंड जनसमुदाय उसळला होता. सभेदरम्यान, भविष्यात होणाऱ्या परिवर्तनासाठी आम्ही सज्ज आहोत, ह्याची ग्वाही उपस्थितांनी दिली.

सभेला संबोधित करतांना उद्धव ठाकरे यांनी, ‘येणाऱ्या लोकसभेत महाराष्ट्राची ताकद संपूर्ण देशाला दाखवून देऊ आणि हुकूमशाहीला रोखू’, असा विश्वास ह्यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन करताना मी एक शपथ घेतली आहे. ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळविला आहे, तो महाराष्ट्र मी महाराष्ट्र द्रोह्यांच्या हाती जाऊ देणार नाही. जे महाराष्ट्र लुटताहेत, ओरबडताहेत, महाराष्ट्राच्या मुळावर उठलेत त्यांचा सुफडासाफ केल्याशिवाय थांबणार नाही.
शरद पवार यांनी आपल्या भाषाणास संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगत सुरुवात केली. या सभेत शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर थेट शाब्दिक हल्लाबोल केला. देशातील जनता महागाई, बेरोजगारी यांसारख्या गंभीर समस्येशी लढत असतांना मात्र मोदींचे जनतेला मुद्यांपासून वळवण्याचे काम सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना, राज्यातील अनेक भागात त्या जायच्या आणि देशातील गरीब लोकांची गरिबी कशी घालवायची यावर विचार मांडायच्या. देशाच्या सर्वच पंतप्रधानांनी हे काम केलं. मात्र, आत्ताचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात आणि त्यांना दोन लोकांची आठवण प्रकर्षणाने होते. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार, या दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र बोलणार नाही. पण, ज्यादिवशी संधी मिळेल त्यादिवशी तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची तयारी आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तेजस ठाकरे तसेच इंडिया – महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

