नवी दिल्ली | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. कन्हैया कुमार ईशान्य दिल्लीतून इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. कन्हैया कुमार आणि सुनीता केजरीवाल यांच्या भेटीनंतर सुनीता केजरीवाल कन्हैया कुमार यांचा प्रचार करू शकतात, अशी चर्चा आहे.
आजच्या या भेटीनंतर मिडिया सोबत बोलतांना कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ आप च्या एक्स वर अपलोड करण्यात आला आहे. त्यात कन्हैया कुमार म्हणाले की,
“देशातील सध्याची परिस्थिती आणि ज्या प्रकारे हुकूमशाही सुरू आहे, त्यामुळे कोणालाही विनाकारण पकडून तुरुंगात टाकले जात आहे. या हुकूमशाहीविरुद्ध आपण गेली अनेक वर्षे लढत आहोत. हुकूमशाहीविरुद्धच्या या लढ्यात आपण सर्व एकत्र आहोत. आम्ही सर्व मिळून ही लढाई लढू, आम्ही त्यांना सर्व काही सांगण्यासाठी गेलो होतो. ते म्हणाले की, भाजपचे केंद्र सरकार दिल्लीतील जनतेचा अपमान करत आहे. जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना कट रचून तुरुंगात टाकले आहे. याचे उत्तर दिल्लीतील जनताच देईल”.
दिल्लीत आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढवत आहेत. दिल्लीत लोकसभेच्या सात पैकी आम आदमी पक्ष चार जागांवर तर काँग्रेसचे उमेदवार तीन जागांवर निवडणूक लढवत आहेत. ईशान्य दिल्ली लोकसभा जागेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून काँग्रेसने कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. कन्हैया कुमार आणि मनोज तिवारी हे बिहारचे रहिवासी आहेत आणि या लोकसभा जागेवर मोठ्या संख्येने मतदार पूर्वांचल आणि बिहारमधील आहेत. कन्हैया कुमारला उमेदवारी दिल्यापासून ते आपल्या प्रचारात व्यस्त आहे. त्यांना आम आदमी पार्टीचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान सुनीता केजरीवाल ह्या रोड शोच्या माध्यमातून ‘जेलमधून आशीर्वाद’ मोहीम राबवत आहेत. कन्हैया कुमारसोबतची त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. कन्हैया कुमार सुनीता केजरीवाल यांना ईशान्य दिल्ली लोकसभा जागेसाठी रोड शो किंवा प्रचार करण्याचे आवाहन करू शकतात अशीही चर्चा आहे.
