Home » राजकीय » … तर मी सांगलीतुन उमेदवारी मागे घेण्यास तयार ; चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ

… तर मी सांगलीतुन उमेदवारी मागे घेण्यास तयार ; चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ

सांगली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज) – सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सूटत नसून तो अधिक गुंतांगुंतीचा होत चालला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस चे नाराज नेते विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरल्यानंतर राज्याच्या राजकारणत खळबळ उडाली आहे. त्यात माझ्या उमेदवारीची इतकी अडचण होत असेल तर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे, असं मोठं वक्तव्य ठाकरे गटाचे सांगली लोकसभा मतदार संघाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे.

सांगलीमध्ये आज महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते. यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने मला उघडपणे सांगावे. मला माहिती आहे, माझ्याकडे कोणताही कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही, असंही ते म्हणाले आहेत. चंद्रहार पाटील म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुंबईला मातोश्रीवर गेलो होतो. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर मिरज येथे पार पडलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भरसभेत माझ्या उमेदवारीची घोषणा केली. तिसऱ्यांदा पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. चौथ्यांदा महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माझ्या उमेदवारीची घोषणा झाली.

चंद्रहार पाटील म्हणाले की, महाविकस आघाडी केवळ सांगलीपुरती नसून संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी संपूर्ण देशात काम करत आहे. त्यामुळे नेमकं यांचं काय दुखणं आहे,हे माझ्या लक्षात आलं नाही.त्यांना माझी व माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे.

दरम्यान सांगली मतदारसंघातुन काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशाल पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवारासमोर अडचणी वाढल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!