मुंबई | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फाऊंडेशन मध्ये ५०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तरात म्हटले की, “संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेत. त्यांनी याचा उपचार करून घ्यावा, उपचारासाठीचा येणारा खर्च आमचे फाऊंडेशन करेन,” असा टोला श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना लगावला आहे. तसेच “संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे, यावरून त्यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वास वाढल्याचे सिद्ध होते. मिडियाने देखील कोणाच्या पत्राची दखल घावी आणि कोणाची नाही हे त्यांना समजलं पाहिजे. तसेच सर्व पैसे खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबीयांच्या खात्यात आले आहेत,” असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.
दरम्यान संजय राऊत यांनी सकाळी ‘एक्स’वरुन पोस्ट केली आहे. “श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशन मध्ये देणग्यांच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये कसे काय जमा झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. “चंदा दो धंदा लो” हा खेळ महाराष्ट्र देखील सुरू आहे. त्या खेळाचे सूत्रधार आहेत, मिंधे सरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मदाय आयुक्त हिशोब द्यायला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत? याची चौकशी झाली पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.
