नागपुर | दि. ५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नागपूर खंडपीठाने अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे. २००६ सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती.
दरम्यान अरुण गवळी हा नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात अरूण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली.
नागपूर खंडपीठात गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर नागपूर खंडपीठाने आज निर्णय देताना अरुण गवळी याच्या मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले. या संदर्भात आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
२००६ या वर्षीचा शासन निर्णय :
शासन निर्णयाच्या आधारेच डॉन अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती. १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याच शासन निर्णया आधारे अरुण गवळीला दिलासा मिळाला आहे.
काय आहे कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण ?
ही घटना २ मार्च २००७ रोजी घडली होती. कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती. त्यानंतर अरूण गवळीने या सुपारीची प्रताप गोडसेला जबाबदारी दिली होती. २ मार्च रोजी कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली.
