Headlines
Home » राजकीय » वंचितकडून दोन ठिकाणी कॉंग्रेसला पाठिंबा; अकोल्यात मात्र आंबेडकरांविरुद्धच कॉंग्रेसचा उमेदवार घोषित

वंचितकडून दोन ठिकाणी कॉंग्रेसला पाठिंबा; अकोल्यात मात्र आंबेडकरांविरुद्धच कॉंग्रेसचा उमेदवार घोषित

अकोला | दि.३१ (वास्तव पोस्ट न्यूज) – अकोला मतदारसंघात महाविकास आघाडीकडून डॉ.अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ४ एप्रिल रोजी आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अकोल्यात अभय पाटील यांच्या निवासस्थानावर महाविकास आघाडी बैठक आज झाली. या बैठकीत डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारीवर सहमती झाली. बैठकीला अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान राज्यात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दोन ठिकाणी पाठिंबा जाहिर केला आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस देखिल आंबेडकरांना पाठिंबा देईल का ? याबाबत राजकीय चर्चा सुरु होत्या. मात्र स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अभय पाटील यांचे नाव जाहीर करुन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा विचारा करावा, आणि मविआसोबत यावे, अशी इच्छा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी व्यक्त केली.

उच्चविद्याविभूषित, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले, वैद्यकीय क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांत निपुण असलेले डॉ. अभय पाटील प्रभावी व दमदार चेहरा असल्याचे बोलले जात आहे. नामवंत अस्थिरोगतज्ञ म्हणून ओळख असलेले डॉ. अभय पाटील हे अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधील संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वांत वरच्या क्रमांकावर होते. त्यांचे वडील डॉ. के. एस. पाटील विश्व हिंदू परिषदेत सक्रिय होते. डॉ. अभय पाटील सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. शासकीय सेवेचा त्यांचा राजीनामा सरकारने न स्वीकारल्यामुळे, त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती.

दुसरीकडे अकोल्यात भाजपचे खासदार संजय धोत्रे हॅट्ट्रिक करून चौथ्यावेळी लढण्याच्या तयारीत आहेत तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अँँड. प्रकाश आंबेडकर नेहमीप्रमाणे रिंगणात कायम राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!