अमरावती | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– रोखठोक बेधडक व्यक्तव्याने जनमाणसात प्रसिद्ध असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतून स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याची घोषणा करुन महायुतीला आव्हानच दिले आहे. त्याचबरोबर नवनीत राणा यांना पाडण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले आहे. यावर भाजपाचे नितेश राणे यांनी सागर बंगल्यावरुन फोन आलेला नाही. एक फोन येताच बच्चू कडू यांचा बंड शमेल असे विधान केले आहे. त्यावर बच्चू कडू यांनी जोरदार पलटवार केला आहे.
दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे महायुतीत आहेत. असे असतांनाही अमरावती मतदार संघात भाजपाच्या नवनीत राणा यांच्या विरोधात लोकसभेसाठी दिनेश बूब यांना तिकीट देण्याचा निर्णय कडू यांनी घेतला आहे. तसेच अमरावती मतदार संघातुन आपण आता माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.
या घटनेवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे की, सागर बंगल्यावरुन आदेश आला तर बच्चू कडू याचं वादळ शमेल. यावर प्रतिक्रिया देतांना बच्चू कडू यांनी नितेश राणे सारखा हलक्या कानाचा माणूस कोणी नाही. त्यांनी मोदीची उघडी पोस्ट व्हायरल केली होती. ब्रह्मदेव जरी खाली आला ना, तरी बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही. नितेश राणेचा असेल. आमचा बाप शेतकरी आहे. आम्हाला थांबविण्याची ताकद भारतात तरी कोणत्या नेत्याकडे नाही असे प्रत्त्युत्तर बच्चू कडू यांनी दिले आहे. विजय शिवतारे यांनी बंड केले होते ते आता थांबले आहे. बच्चू कडू थांबणार का ? असे माध्यमांमधून विचारले असतां, ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आता बच्चू कडूला कोणी थांबवू शकत नाही असे बच्चू कडू म्हणाले.
