नवी दिल्ली | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे.
दरम्यान राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे या सहा आमदारांना हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह पठानिया यांनी २९ फेब्रुवारी रोजी अपात्र ठरवले होते. तसेच निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर देखील केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या बंडखोर आमदारांना जनतेकडून काय कौल मिळणार हे जनताच ठरवेल.
राज्यसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं ?
हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली होती. काँग्रेसने याठिकाणी अभिषेक मनु सिंघवी याना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून हर्ष महाजन यांना तिकीट देण्यात आलं होते. विजयासाठी ३५ आमदारांच्या मतांची गरज होती. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे ४० आमदार असल्याने अभिषेक मनु सिंघवी यांचा विजय निश्चित होता, मात्र मतदानाच्या दिवशी भलतंच घडलं. काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होट केले. तीन अपक्ष आमदारांनीही भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना ३४-३४ मते मिळाली. अखेर चिट्टीद्वारे भाजपच्या हर्ष महाजन यांना विजयी करण्यात आले होते.
