Home » राजकीय » मोठी भविष्यवाणी: जरांगेंनी लोकसभा लढावी, ७०% मताधिक्य मिळणार; आमच्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

मोठी भविष्यवाणी: जरांगेंनी लोकसभा लढावी, ७०% मताधिक्य मिळणार; आमच्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

मुंबई | दि.२३ (वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जालना लोकसभा निवडणूक लढवावी. तेथुन ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा‘ या खास कार्यक्रमात वंचितची जागावाटपासंबंधी भूमिका, महाविकास आघाडीचे निवडणुकीतील भविष्य, भाजपला रोखण्याचा विरोधी पक्षाचा प्लॅन, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली मते मांडली. मात्र या पूर्ण मुलाखतीदरम्यान त्यांनी वंचितला कोणते मतदारसंघ किंवा किती जागा पाहिजे, यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. कारण आमचे उमेदवार पळविले जातात, त्यामुळे मी माझे पत्ते अजिबात खुले करणार नाही, असे ते म्हणाले.

आंदोलनाचे पुढे काय होते, याचा मी साक्षीदार आहे
मराठा आरक्षणावर बोलतांना आंबेडकर म्हणाले की, म्हणून जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढावी. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनाचा मी साक्षीदार आहे तसेच पवार आणि खेडेकरांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलनही मी पाहिले आहे. छावा-जिजाऊ संघटनांची घौडदौड आणि दिशाही मी पाहिली आहे. या सगळ्या आंदोलनाचं पुढे काय होतं, हे मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना जर फसायचे नसेल तर त्यांना निवडणुकीला उभे राहावेच लागेल, असे मी स्वत: जरांगे यांना सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, हे मी त्यांना भेटून सांगितले आहे. परंतु ते निवडणूक लढण्यास तयार नाहीत. मी अजूनही सांगतो, माझा आणि माझ्या पक्षाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असेल. जालन्यातून त्यांनी जर लोकसभा निवडणूक लढवली तर एकही रुपया खर्च न करता ७० टक्के मते घेऊन ते प्रतिस्पर्धी उमेदवाराला चितपट करतील, अशी मोठी भविष्यवाणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!