Headlines
Home » राष्ट्रीय » मोठी बातमी : अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

मोठी बातमी : अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

दिल्ली | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– दिल्लीचे मुख्यमंत्री आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना शंभर कोटीं रुपयांच्या दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. ईडीचे अधिकारी दोन तास केजरीवाल यांच्या घरी ठाण मांडून होते. दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितले की अटक जरी झाली असली तरी देखील केजरीवाल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत.

दरम्यान केजरीवाल यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले असुन सत्ताधारी पक्षाविरोधात आणि अटकेविरुध्द घोषणा दिल्या जात आहे. केजरीवाल यांच्या घराच्या परिसरात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. इतकेच नाही तर ईडी ऑफिसच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शंभर कोटीं रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात याआधीच आप पक्षाचे मनीष सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी २०२३, संजय सिंह ४ ऑक्टोबर २०२३, के. कविता यांना १५ मार्च २०२४ मध्ये आणि आज २१ मार्च २०२४ अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या घरी चौकशी करून घरूनच अटक केली आहे. चौकशी दरम्यान केजरीवाल यांचा मोबाईल देखील ईडी ने जप्त केला होता.

अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून एक निवेदनही देण्यात आले. आज रात्रीच आमची सुनावणी घ्यावी अशी विनंती निवेदनात केली होती. मात्र सुप्रीम कोर्टात रजिस्टारने सुनावणी उद्या होईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांना उद्या सुप्रीम कोर्टात हजर केले जाणार आहे. विरोधकांनी या अटकेला विशुद्ध राजकारण असे म्हटले आहे, तर सत्ताधाऱ्यांनी ही भ्रष्टाचार विरोधी कारवाई असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत ठिकठिकाणी बॅरिकेट्स वाढवण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेता दिल्लीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेरून कार्यकर्त्यांची उचलबांगडी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!