जळगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये रेड एरिया असुन याठीकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एसडीपीओ व चोपडा पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकुन कारवाई केल्याचे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी सांगितले
सविस्तर वृत्त असे की चोपडा शहरामध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार एसडीपीओ व चोपडा शहर पोलिस पीआय यांनी एक पथक नेमले. पथकाच्या मार्गदर्शनाखाली काल सायंकाळी एक डमी ग्राहक तिथे पाठविण्यात आला. या डमी ग्राहकाकडून त्याठिकाणी पैशांचा व्यवहार झाल्यानंतर डमी ग्राहकाने खात्री पटल्याबरोबर पोलिसांना इशारा केला. पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब त्या रेड एरियावर धाड टाकली.

दरम्यान धाडीत त्याठिकाणी एकूण ११ मालकीण स्त्रीया तसेच देहविक्री करणाऱ्या तब्बल ५० महीला आढळून आल्यात. त्या ५० महिलांची तेथून सुटका करण्यात आली आहे. आरोपींच्या तावडीतून सुटका केलेल्या ५० महिलांना कोर्टाच्या आदेशानुसार आशादिप महिला सुधार गृहात ठेवण्यात आले असुन ११ आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी याआधी अश्या प्रकाराच्या कोणत्या गुन्ह्यात सहभागी होते का याचा तपास केला असता गेल्यावर्षी याच परिसरातून ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या ९ आरोपींपैकी काही आरोपींचा आता अटक केलेल्या ११ आरोपींमध्ये समावेश आहे.
देहविक्री करणाऱ्या त्या ५० महिलांची सविस्तर चौकशी केली असता सर्व महिलांनी आपण चोपडा येथील रहीवासी असल्याचे सांगितले. मात्र अधिक तपास केला त्यात काही महिला मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बंगाल, इतर ठिकाणच्या आहेत. संपूर्ण ओळख, तसेच मूळ रहिवास कुठला आहे त्या दिशेने तपास सुरू आहे. अटक केलेल्या ११ आरोपींनी ५० महिलांना डांबून जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पाडले होते. जळगाव शहरातही काही ठिकाणी हॉटेल तसेच लॉजिंगच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय सुरू असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी म्हणाले की, जर आमच्याकडे कोणी अशी तक्रार केली तर आम्ही पूर्ण नियोजन करून त्याठिकाणी नक्कीच कारवाई करू.
दरम्यान अश्या घटना त्या परिसरात होऊ नये या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. ज्या ठिकाणी ही वस्ती आहे ती अतिक्रमण करून उभारली आहे, याबाबत मनपाला पत्रक देऊन तिथून ती वस्ती काढण्यात येणार आहे. तसेच त्या वस्तीस नळ, विजेच्या सोई, इतर सुविधा देखील बेकायदेशीररित्या देण्यात आल्या आहेत. त्या बाबत संबंधित विभागास पत्रक देऊन सुविधा बंद करण्यात येणार असून यापुढे भविष्यात पुन्हा हा कुंटणखाना सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनी चांगली करवाई केल्या बद्दल खूप अभिनंदन