Home » राजकीय » गडकरींविरोधात नागपुरात बळकट उमेदवार देणार ! काँग्रेसचे बडे नेते एकवटले, हालचालींना वेग

गडकरींविरोधात नागपुरात बळकट उमेदवार देणार ! काँग्रेसचे बडे नेते एकवटले, हालचालींना वेग

मुंबई | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीमुळे सर्वच पक्षाचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. काँग्रेस आपल्याकडून नागपुरात नितीन गडकरींविरोधात ताकदवार उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले असुन काँग्रेसचे बडे नेते एकवटले आहेत व भेटीगाठी बैठकांना वेग आला आहे.

भाजपने नागपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या कामातून राष्ट्रीय पातळीवर छाप सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोण लढणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. काँग्रेसनेही तशी चाचपणी सुरू केली होती. मात्र, चर्चेतला चेहरा काही अद्याप समोर आलेला नाही. मात्र, नागपुरात विलास मुत्तेमवार सक्रिय आहेत. प्रत्येक मुद्यावर रोखठोक मत मांडणारे नेते म्हणून त्यांची जनमानसात चांगली ओळख आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील आणखी एक नेते सतीश चतुर्वेदी माजी मंत्री आहेत आणि नितीन राऊतही माजी मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यात योग्य ताळमेळ नसल्याने नागपूरमध्ये भाजपने आपली मुळं घट्ट करून काँग्रेसचं बळ कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता हे तिन्ही नेते कामाला लागले आहेत. तसं बघितलं तर या तिनही नेत्यांचे जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे , मात्र काही कारणास्तव एकमेकांत नाराजी चा सूर राहिल्यामुळे नागपुरात काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळविता आले नाही. आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते एकत्रित आले असून, काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याचीच उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून आहे. विशेष म्हणजे मागच्या काही वर्षांपासून हे तिनही नेते एकत्रित आलेले नव्हते, परंतु पक्षीय पातळीवर उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू असल्याने आज या तिन्ही नेत्यांनी एकत्रित प्रवासही केला.

नागपूरमधील लढत रंगतदार होणार ?
नागपूरमधून भाजपने पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच उमेदवारी दिल्याने बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी गडकरींविरोधात लढण्यास असमर्थता दर्शविल्याचे बोलले जात होते. परंतु नागपूरमधील काँग्रेसचे जुनेजाणते, लोकप्रिय नेते कामाला लागल्याने गडकरींविरोधात तगडा उमेदवार उतरविला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचे सर्व नेते आलबेल विसरून एकत्र येऊन एकजुटीने कामाला लागल्यास गडकरी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!