Home » क्राईम » डोक्यात गोळी, नंतर कोयत्याने वार ! पुण्याच्या हॉटेलमध्ये हिस्ट्रीशीटरची निर्घृण हत्या

डोक्यात गोळी, नंतर कोयत्याने वार ! पुण्याच्या हॉटेलमध्ये हिस्ट्रीशीटरची निर्घृण हत्या

पुणे | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – पुण्यात एका व्यक्तीची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इंदापूर येथील रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री जेवण करण्यास गेलेल्या हिस्ट्रीशीटर अविनाश धनवे याची हॉटेलमध्येच गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अचानक गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. हल्लेखोरांनी मित्रांसोबत बसलेल्या अविनाशच्या डोक्यात आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेच्यावेळी रेस्टॉरंटमध्ये इतरही अनेक लोक उपस्थित होते. त्याचवेळी मयत अविनाश धनवे याच्यासोबत असलेले त्याचे तीन साथीदार गोळीबार होताच घटनास्थळावरून पसार झाले. प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून या हत्येमागचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असलेल्या अविनाशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर ६ ते ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. शनिवारी रात्री आठच्या सुमारास तो आपल्या तीन मित्रांसह इंदापूर येथील हॉटेल जगदंबा येथे जेवायला गेला होता. त्यानंतर मागून ६ ते ७ हल्लेखोर आले आणि त्यांनी खुर्चीवर बसलेल्या अविनाशच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. आरोपींनी हा खून अतिशय नियोजित पद्धतीने केला. हत्येनंतर आरोपी हॉटेलबाहेर त्यांच्या कारमध्ये बसुन फरार झाले.

दरम्यान, एसपी पंकज देशमुख यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. देशमुख यांनी हल्लेखोरांना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचे एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे दोन प्रतिस्पर्धी गटांमधील जुन्या शत्रुत्वाशी संबंधित असल्याचे दिसते. घटनेदरम्यान सीसीटीव्हीत दिसलेल्या आठ जणांची आम्ही ओळख पटवली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. पुढील तपास चालु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!