सात टप्प्यात निवडणुका ; पहिला टप्पा १९ एप्रिल तर शेवटचा १ जून , निकाल ४ जूनला
नवी दिल्ली | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. देशात नविन मतदार विशेषतः महिला मतदारांची संख्या वाढल्याचंही त्यांनी सांगितलं.
देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे.
देशभरात सात टप्प्यात मतदान :
पहिला टप्पा – १९ एप्रिल
दुसरा टप्पा – २६ एप्रिल
तिसरा टप्पा – ७ मे
चौथा टप्पा – १३ मे
पाचवा टप्पा – २० मे
सहावा टप्पा – २५ मे
सातवा टप्पा – १ जून
महाराष्ट्रात या पाच टप्प्यात होणार मतदान :
◆️ पहिला टप्पा : १९ एप्रिल; रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◆️ दुसरा टप्पा : २६ एप्रिल; बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◆ तिसरा टप्पा : ७ मे; रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◆️ चौथा टप्पा : १३ मे; नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◆ पाचवा टप्पा : २० मे; धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
मतमोजणी :४ जून
देशात ९७ कोटी मतदार
आपल्या देशात ९७.८ कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात ४९.७ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. यंदा ८२ लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. ४८ हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यंदा महिला मतदारांची संख्या वाढली आहे. १ एप्रिल रोजी ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे, अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली.
१७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जूनला संपणार आहे. २०२४ लोकसभासाठी ५५ लाखाहून अधिक ईव्हीएम मशीन तयार ठेवण्यात आल्या आहेत. देशात १०.५ लाख पोलिंग स्टेशन आहेत. या निवडणुकीसाठी १.५ कोटी पोलिंग अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात असतील, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
