Home » राजकीय » ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस ! छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवारीसाठी मी गेल्या १० वर्षापासून स्पर्धेत : अंबादास दानवे

ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस ! छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवारीसाठी मी गेल्या १० वर्षापासून स्पर्धेत : अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर | दि.१६ (वास्तव पोस्ट न्यूज)– मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटातील धुसफूस समोर आली आहे. अंबादास दानवे यांनी आपली नाराजी व्यक्त केली असुन चंद्रकांत खैरे हे आपल्याला सातत्याने डावलत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांनी लोकसभेसाठी आपण आग्रही असल्याचे सांगीतल्याने ठाकरे गटासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. मात्र शिंदे गटात जाणार नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद यापूर्वीही समोर आलेले आहे. उमेदवारी मिळण्यापूर्वीच खैरे यांनी प्रचाराला सुरुवात केल्याने दानवे नाराज आहेत. त्यांना कार्यालयाच्या भूमिपूजनाला सुद्धा बोलविण्यात आले नाही. याविषयीची तक्रार त्यांनी पक्षप्रमुखांकडे केल्याची माहिती दिली. आपण खैरेंसाठी नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करतो, असा टोलाही दानवे यांनी हाणला.

लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मत मांडले. मी गेल्या दहा वर्षांपासून उमेदवारी मागत आहे. ही बाब काही लपून राहिलेली नाही. मी गेल्या दोन टर्म लोकसभेसाठी आग्रही आहे. दोन्ही वेळा उमेदवारी मिळालेली नसली तरी मी पक्षाचे काम केले आहे. त्यामुळे मी पक्ष सोडून जाणार या हवेतील गोष्टी आहेत. त्यात काही तथ्य नाही. मी कोणत्याही गटात जाणार नाही. जोपर्यंत लोकसभेचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत मी लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या स्पर्धेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!