मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी विविध पक्षाच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून केली जात होती. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान शासनाने याआधी औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं आहे. त्यानंतर आज अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता दिली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं देखील नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
