नागपूर | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात एकच गोंधळ झाल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली. त्यात एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू तर अनेक महिला ह्या जखमी झाल्या आहेत. मनूबाई तुळशीराम राजपूत ,रा. आशीर्वाद नगर असे या मृतक महिलेचे नाव आहे.
सविस्तर निवृत्त असे की आज शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत, नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण होणार होते. येथे लोकांची गर्दी एवढी वाढली की त्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले आहेत.मनू तुलसीराम राजपूत असे या मृत महिलेचे नाव आहे. मनू यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे
दरम्यान या घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
नागपुरातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजपच्या नागपूर येथील कार्यक्रमात चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूला कोण जबाबदार? असा थेट सवाल करत त्यांनी सोशल मीडियावरून टीका केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वगळता घटनास्थळावरून सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नेतेमंडळी हे निघून गेले. तसेच या घटनेनंतर हे शिबिर रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. चेंगराचेंगरीच्या ठिकाणची शेकडोच्या संख्येने सुटून गेलेल्या पादत्रानाची साफसफाई करण्यात आली.
