चंद्रपूर | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– भारत सरकारने प्रत्येक गावापर्यंत रस्ते, वीज व पाणी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विकास विभागही यासाठी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात १०० टक्के आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली.
दरम्यान चंद्रपूर येथील नियोजन सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित ‘अनुसूचित जमातीच्या विविध योजनांचा लाभार्थी मेळावा ‘ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, नागपूर येथील आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त जी.एस. कुळमेथे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. इंगळे, श्री. मडावी, रामपालसिंग, सयाराम गोटे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. गावित म्हणाले की, आदिवासी जनतेचे प्रश्न समजून ते सोडविणे व हा समाज मुख्य प्रवाहात आनण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, जो पात्र आहे अशा सर्वांना घरकुल देण्यात येईल असे ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव घरापासून वंचित राहणार नाही. ज्यांच्या जवळ घरकुलसाठी जमीन नाही, त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाने रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. रस्ता, वीज, पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमाचे संचालन उमेश कडू आणि सपना पिंपळकर यांनी केले. यावेळी अनुसूचित जमातीच्या विविध योजनांचा लाभार्थी मेळाव्यास मोठ्या संख्येने लाभार्थी व आदिवासी बांधव उपस्थित होते.
