Headlines
Home » महाराष्ट्र » मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फीचा मोह बेतेल जीवावर; नियम मोडल्यास होणार मोठा दंड

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फीचा मोह बेतेल जीवावर; नियम मोडल्यास होणार मोठा दंड

लोणावळा l वास्तव पोस्ट वृतसेवा

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक नुकतीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, या मार्गावरील नयनरम्य केबल स्टेड ब्रिज आणि भव्य बोगद्यांच्या ठिकाणी फोटो, सेल्फी आणि रिल्स काढण्यासाठी वाहनचालक गाड्या थांबवत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनचालकांना कडक इशारा दिला आहे.

सेल्फी आणि रिल्सचा धोका

प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक पर्यटक आणि चालक नियमांचे उल्लंघन करून पुलावर किंवा बोगद्याजवळ वाहने उभी करत आहेत. द्रुतगती मार्गावर अशा प्रकारे वाहने थांबवणे हे केवळ बेकायदेशीरच नाही, तर अत्यंत धोकादायक आहे. यामुळे मागून येणाऱ्या वेगवान वाहनांचा भीषण अपघात होऊ शकतो.

नव्या मार्गावरील वेग मर्यादा

महामार्ग पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या लिंक प्रकल्पासाठी नवीन वेग मर्यादा निश्चित केली आहे. हलकी मोटार वाहने ताशी १०० किमी वेगाने चालू शकतात, तर बस आणि प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित करण्यात आला आहे.

सावधान! २४ तास सीसीटीव्हीचे लक्ष

या संपूर्ण मार्गावर, विशेषतः दोन बोगदे आणि पुलांवर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. जर कोणीही फोटो किंवा रिल्ससाठी गाडी थांबवल्यास सीसीटीव्हीच्या आधारे त्यांच्यावर मोठ्या दंडाची कारवाई केली जाणार आहे.

प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (द्रुतगती मार्ग) वरील जुन्या लोणावळा-खंडाळा घाटाला (बोर घाट) पर्याय म्हणून तयार करण्यात आलेला हा १३.३ किलोमीटरचा नवीन मार्ग मुंबई बाजूकडील खालापूर आणि पुण्याकडील कुसगाव या दोन टोकांना जोडतो. या मार्गावर खंडाळा घाटातील ‘टायगर व्हॅली’ वर एक भव्य केबल स्टेड ब्रिज बांधण्यात आला आहे. हा पूल जमिनीपासून साधारण १८० मीटर उंचीवर असून तो भारतातील सर्वात उंच रस्ते पुलांपैकी एक आहे. या प्रकल्पात आशियातील सर्वात रुंद बोगद्यांचा समावेश आहे. लोणावळा तलावाच्या खालून जाणारा हा मार्ग प्रवाशांसाठी अभियांत्रिकीचे एक मोठे आश्चर्य ठरत आहे.

प्रशासनाचे आवाहन

तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा हा आमचा उद्देश आहे. मात्र, रिल्स किंवा सेल्फीच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

प्रवास वेगाचा करा, पण सुरक्षिततेचे भान राखा.
सुरक्षितता हीच प्राथमिकता आहे. नियमांचे पालन करा आणि स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!