🏏 JCL-T20 ट्रॉपीसह जल्लोष करताना जळगाव कोगटा किंग्ज संघ
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर पार पडलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या (जेसीएल) दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या महामुकाबल्यात जळगाव कोगटा किंग्जने अमळनेर सुहांस जायंट्सवर ५ गडी राखून मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
नाणेफेक जिंकून जळगावच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर अमळनेरला २० षटकात १६६ धावांवर रोखले. अमळनेरकडून शुभम शर्मा याने ६२ आणि रणजित निकम याने ४७ धावांची खेळी केली. जळगावचा कर्णधार जगदीश झोपे याने १८ धावांत ४ गडी बाद करत अमळनेरच्या धावसंख्येला लगाम घातला.
पुर्वेश चौधरीची वादळी फलंदाजी
विजयासाठी मिळालेले १६७ धावांचे आव्हान पार करताना जळगाव कोगटा किंग्जची सुरुवात दमदार झाली. ओम भोसले (३४ धावा) आणि जितेंद्र निकम (३३ धावा) यांनी ५० धावांची सलामी दिली. त्यानंतर मनिष चौहान याने ३६ धावांचे योगदान दिले. मात्र, सामन्याचे खरे आकर्षण ठरला तो पुर्वेश चौधरी. त्याने अवघ्या २२ चेंडूंमध्ये ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ४३ धावा फटकावत जळगावचा विजय सुकर केला. जळगावने १८.२ षटकात ५ गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले आणि जेसीएलच्या चषकावर मोहोर उमटवली.
भव्य सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, युसूफ मकरा, सिद्धार्थ बाफना, यश सुनील मंत्री आणि जयवंत नागूलकर उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्यात मागील पर्वाचे विजेते संघमालक प्रकाश चौबे आणि कर्णधार शशांक अत्तरदे यांनी चषकासह मैदानात प्रवेश केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या भव्य नियोजनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले आहे.
पारितोषिकांचा वर्षाव आणि खेळाडूंचा गौरव

विजेत्या जळगाव कोगटा किंग्ज संघाला २ लाख रुपये रोख आणि चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान करण्यात आली. उपविजेत्या अमळनेर सुहांस जायंट्सला १ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरवण्यात आले. अमळनेरचा शुभम शर्मा ‘प्लेअर ऑफ द लीग’ ठरला, त्याला पल्सर मोटारसायकल देण्यात आली.


जळगावचा ओम भोसले ‘बेस्ट फलंदाज’ तर जामनेरचा रवि पाटील ‘बेस्ट गोलंदाज’ ठरला. पुर्वेश चौधरी याला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
प्रेक्षकांच्या गर्दीने मोडले सर्व विक्रम
जळगाव क्रिकेट लीगच्या या अंतिम सामन्याला जळगावकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मेहरुण परिसरातील क्रीडांगण प्रेक्षकांनी ओसंडून वाहत होते. डीजेचा ताल आणि आकर्षक रोषणाईने मैदानाचा परिसर उजळून निघाला होता. जळगाव कोगटा किंग्जने विजय मिळवताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. या स्पर्धेत जळगाव कोगटा किंग्जचे मालक प्रेम कोगटा, अतुल कोगटा, प्रणव कोगटा, प्रशिक्षक घनश्याम चौधरी तसेच इतर पाच संघांच्या मालकांनी आणि एकूण १०८ खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले होते.
अंतिम सामन्याचा धावफलक (संक्षिप्त)
अमळनेर सुहान्स जायंट्स (ASG) फलंदाजी
एकूण धावसंख्या: १६६/८ (२० ओव्हर्स)
| फलंदाज | धावा (चेंडू) | गोलंदाज | बळी-धावा (ओव्हर्स) |
|---|---|---|---|
| शुभम शर्मा | ६२ (४३) | झोपे जगदीश | ४-१८ (४) |
| रणजित निकम | ४७ (२९) | उबेद खाटिक | ३-१३ (३) |
| मानव तिब्रेवाला | २६ (१९) | मेहुल पंकज इंगळे | ०-४४ (४) |
जळगाव कोगटा किंग्स (JKK) फलंदाजी
एकूण धावसंख्या: १७१/५ (१८.२ ओव्हर्स)
| फलंदाज | धावा (चेंडू) | गोलंदाज | बळी-धावा (ओव्हर्स) |
|---|---|---|---|
| पुर्वेश चौधरी | ४३ (२२) | सतीश चतुर्वेदी | ३-३६ (४) |
| मनीष चव्हाण | ३६ (२५) | गौरव ठाकूर | १-२६ (२.२) |
| ओम भोसले | ३४ (१९) | रोहित पारधी | ०-२८ (२) |
निकाल
जळगाव कोगटा किंग्स (JKK) ५ गडी राखून विजयी झाले

