मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा
राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक अत्यंत महत्त्वपूर्ण नियमावली जाहीर केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी होणारी प्रतारणा थांबवण्यासाठी आता मेन्यूकार्डवर पदार्थांचे घटक स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मेन्यूकार्डवर सत्यता लिहिणे आता बंधनकारक
आता कोणत्याही खाद्यपदार्थात नैसर्गिक ‘पनीर’ वापरले आहे की ‘चीज ॲनालॉग’ (Cheese Analogue), हे मेन्यूकार्ड किंवा डिजिटल डिस्प्लेवर स्पष्टपणे लिहावे लागणार आहे. अनेक ठिकाणी पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि वनस्पतीजन्य घटकांपासून बनवलेले पर्याय वापरून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
२५ मार्चपासून राज्यव्यापी विशेष मोहीम
मंत्र्यांच्या विशेष सूचनेनुसार, २५ मार्च २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. ज्या हॉटेल्समध्ये नियमांचे उल्लंघन केले जाईल किंवा ग्राहकांची दिशाभूल केली जाईल, अशा व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये संबंधित हॉटेलचा परवाना रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
काय आहे ‘पनीर’ आणि ‘चीज ॲनालॉग’ मधील फरक?
प्रशासनाने ग्राहकांना सजग राहण्याचे आवाहन करताना या दोन्हीमधील फरक स्पष्ट केला आहे:
पनीर: हे पूर्णपणे दुधापासून तयार केले जाते, जे आरोग्यासाठी पोषक असते.
चीज ॲनालॉग: हे प्रामुख्याने वनस्पती तेल, स्टार्च आणि इतर रासायनिक घटक वापरून तयार केले जाते. हे नैसर्गिक पनीरपेक्षा स्वस्त असते.
पुरवठादारांनाही प्रशासनाचे निर्देश
केवळ हॉटेलचालकच नव्हे, तर पनीर आणि चीजचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. पुरवठादारांनी त्यांच्या बिलावर संबंधित पदार्थ ‘चीज ॲनालॉग’ असल्याचा स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य आहे. यामुळे साखळीतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
येथे करा तक्रार
जर एखाद्या हॉटेलमध्ये ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिक अन्न व औषध प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात.
