ओम मुंडे याला प्लेअर ऑफ मॅच पुरस्कार प्रदान करताना अभंग जैन, अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप जोशी आदी मान्यवर
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL) मध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने अटीतटीच्या सामन्यात रावेर रॉयल्सवर मात केली, तर दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने जामनेर सातपुडा हिरोजचा धुव्वा उडवत दिमाखदार विजय नोंदवला.
चाळीसगावचा धावांचा डोंगर, रावेर रॉयल्सचे आव्हान संपुष्टात
प्रथम फलंदाजी करताना चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने ५ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. लोकेश पाटील स्वस्तात बाद झाल्यावर ओम मुंडे (८५ धावा, ५६ चेंडू) आणि साहिल गायकर (७७ धावा, ४७ चेंडू) यांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडत दुसऱ्या विकेटसाठी ऐतिहासिक भागीदारी केली. रावेरकडून यश नहार आणि संदेश सुरवाडे यांनी काहीसा प्रतिकार केला.
१८४ धावांचे लक्ष्य गाठताना रावेर रॉयल्सने लढा दिला, परंतु १९.३ षटकांत १७५ धावांवर त्यांचा डाव आटोपला. यश नहार आणि तुषार चोरडिया यांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र अमेय कोळी आणि सरज पाटील यांच्या भेदक माऱ्यासमोर रावेरचे फलंदाज टिकू शकले नाहीत. या पराभवासोबतच रावेर रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ओम मुंडेला ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात कोगटा किंग्सचा जामनेरवर एकतर्फी विजय
दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने जामनेर सातपुडा हिरोजवर १०९ धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ओम भोसले (६४ धावा) आणि जितेंद्र नाईक (६४ धावा) यांनी १०२ धावांची सलामी देत संघाला १९६ धावांपर्यंत मजल मारून दिली. जामनेरच्या ललित पाटीलने ३ बळी घेतले, मात्र तोपर्यंत किंग्सने मोठी धावसंख्या उभारली होती.
१९७ धावांचा पाठलाग करताना जामनेरची अवस्था अत्यंत बिकट झाली. सलामीचे दोन्ही फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. सागर भावर (३/१२), राज बेलदार आणि बिपिन चांगरे यांच्या अचूक माऱ्यापुढे जामनेरचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत अवघ्या ८५ धावांत गारद झाला. ओम भोसले याला ‘मॅन ऑफ दी मॅच’ देऊन सन्मानित करण्यात आले.
आजच्या सामान्यास मान्यवरांची उपस्थिती
या सामन्यांच्या निमित्ताने अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, अभंग जैन, कुणाल शहा, डॉ. राजेश पाटील, सीमा पाटील, किरण बच्छाव, अतुल कोगटा, गौरव साफळे, ॲड. सूरज जहांगीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जळगावमधील क्रिकेट प्रेमींनी या सामन्यांचा मोठा आनंद लुटला.
