Headlines
Home » जळगाव » संतापाच्या भरात पतीनेच उद्ध्वस्त केले हसतेखेळते कुटुंब; तीन मुले पोरकी!

संतापाच्या भरात पतीनेच उद्ध्वस्त केले हसतेखेळते कुटुंब; तीन मुले पोरकी!

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात गुरुवारी दुपारी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर भीषण संघर्षात होऊन, एका ३५ वर्षीय पतीने आपल्या पत्नीवर लोखंडी विळ्याने सपासप वार करत तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण निमखेडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिपाली नितीन सोनवणे (वय २८) या पती नितीन आणि तीन मुलांसह (दोन मुले व एक मुलगी) निमखेडी येथे राहत होत्या. नितीन हा मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत होते. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. संतापाच्या भरात नितीनने जवळच असलेला लोखंडी विळा उचलला आणि दिपाली यांच्या मानेवर व पोटावर गंभीर वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात दाखल:

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी नितीन विजय सोनवणे याने पळून न जाता थेट जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

​आईचा मृत्यू आणि वडिलांना अटक झाल्यामुळे या कुटुंबातील तीनही लहान मुले उघड्यावर पडली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!