नाशिक l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली संबंधित महिलेचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर, कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार २०२२ पासून ते डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
महत्त्वाचे धागेदोरे:
• आक्षेपार्ह चित्रफिती: पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे तब्बल ५८ आक्षेपार्ह चित्रफिती हस्तगत केल्या आहेत.
• मोठे धागेदोरे: या चित्रफितींमध्ये काही नामांकित महिला, वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांची माहिती असल्याचे बोलले जात आहे.
• पोलीस कोठडी: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अशोक खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजकीय नेत्यांशी संबंध आणि वाद
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून तो अंकगणिताच्या आधारे भविष्य सांगत असे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक बड्या राजकीय नेत्यांचा आणि सेलिब्रेटींचा राबता त्याच्याकडे होता.
१. विद्यमान पदाधिकाऱ्यांचे नाव: ‘श्री शिवनिका संस्थान’च्या कार्यकारी मंडळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव सदस्य म्हणून असल्याचे समोर आले आहे.
२. विरोधकांची टीका: चाकणकर या खरातची पाद्यपूजा करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
३. राजीनाम्याची मागणी: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावरून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अशोक खरात कोण आहे?
मूळचा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील असलेला खरात मिरगाव शिवारात ‘ईशान्येश्वर मंदिरा’ची उभारणी करून तिथे आपले संस्थान चालवत होता. नौदलातील निवृत्त अधिकारी म्हणून त्याची मोठ्या मंडळींमध्ये उठबस होती, ज्याचा फायदा घेऊन त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.
