पुणे l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
वाघोली: पुण्यातील वाघोली परिसरात जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट समोर एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्यावर जुन्या किरकोळ वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यातील कोयता थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात अडकून राहिला. ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
घटना कशी घडली?
नागेश जगताप (४थ्या वर्षाचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी) आणि त्याचा मित्र सिद्धेश भोसले हे दोघे कॉलेजसमोरच्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. त्याच वेळी मंगेश सांगळे (मुख्य आरोपी) आपल्या दोन साथीदारांसह (रोहन गवळी आणि एक अल्पवयीन) मोटरसायकलवर तिथे आला. जुन्या वादाचा राग मनात धरून मंगेशने नागेशला “तू मला शिवी का दिलीस?” असा प्रश्न विचारला आणि क्षणार्धात वाद हाणामारीत रूपांतरित झाला.

‘थरार’ हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भररस्त्यात सुरू असलेल्या या हल्ल्यात आरोपींनी नागेशवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. नागेशच्या पाठीवर, अंगावर आणि शेवटी डोक्यात जोरात वार करण्यात आला. हा वार इतका जोरात होता की कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. नागेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरही आरोपींची दहशत सुरूच होती. नागेशला वाचवण्यासाठी गेलेल्या सिद्धेशवरही आरोपींनी वार केले, ज्यात तोदेखील गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज पाहून अंगावर शहारे येत आहेत.
पोलीस कारवाई
वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही आरोपींना (मंगेश सांगळे, रोहन गवळी आणि एक अल्पवयीन) अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.” दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जखमींवर उपचार सुरु
नागेश जगतापला प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्यात अडकलेला कोयता काढून उपचार करण्यात आले. नंतर त्याला खराडी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. सिद्धेश भोसले यालाही उपचार देण्यात आले आहेत.
वाघोली पोलिस स्टेशन
या घटनेमुळे वाघोली-लोणीकंद परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, “कोणतीही असामाजिक घटना घडू देणार नाही,” असे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी अशा घटनांबाबत सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

