वास्तव पोस्ट l जळगाव : जळगावच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संदीप गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी थेट मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. अधिकाराचा दुरुपयोग करून अमानुष मारहाण केल्याचा गंभीर ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्रावर नक्की काय घडलं ?
२०२६ च्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. कुलभूषण पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करत या पोलीस अधिकाऱ्यांनी मतमोजणी कक्षात अनधिकृत प्रवेश केला. कोणतीही चूक नसताना पाटील आणि त्यांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झाल्यामुळे कुलभूषण पाटील यांना काही दिवस खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते.

तक्रारीतील मुख्य मुद्दे
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची रीतसर परवानगी नसताना मोजणी कक्षात घुसखोरी. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना जबरदस्तीने बाहेर काढत अमानुष लाठीमार करणे, तसेच मोजणी केंद्राबाहेर महिला कार्यकर्त्यांचा अवमान करत पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक यांच्याबाबत ड्रग्ज रॅकेटचा उल्लेख
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचा एका ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचा संदर्भही तक्रारीत दिला आहे. एकंदरीत घडलेल्या सर्व घटनेचे पुरावे मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह पुराव्यादाखल प्राधिकरणाला सोपवण्यात आले आहेत.
कायद्याच्या कचाट्यात अडकणार ‘खाकी’ ?
ॲड. हरुल एस. देवरे यांच्यामार्फत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. “पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत, पण जळगावात त्यांनी भक्षकाची भूमिका बजावली,” अशी संतप्त भावना कुलभूषण पाटील यांनी व्यक्त केली आहे. प्राधिकरणाकडे सादर केलेल्या पुराव्यांमुळे आता जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आव्हाड यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

