वास्तव पोस्ट l जळगाव : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेशद्वारासमोर तसेच संरक्षण भिंतीला लागून सुरू असलेले अनधिकृत कचरा हस्तांतरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे, खुद्द महापौर आणि उपमहापौर यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून कचरा संकलन बंद करण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत एकप्रकारे प्रशासनाने या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखवत पुन्हा त्याच ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
● नेमका प्रकार काय?
जळगाव आयटीआय हे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक केंद्र आहे. तसेच सदर परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने याठीकाणी सतत विदयार्थ्यांची वर्दळ सुरु असते. आयटीआय च्या अगदी समोरच महापालिकेकडून शहरातील कचरा हस्तांतरण केला जातो. यामुळे परिसरात स्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधी पसरली असून रस्त्याने जाणारे नागरिक तसेच येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिक आणि विदयार्थी यामुळे त्रस्त झाले आहेत.

● आदेशालाच दिली कचऱ्याची टोपली
दोनच दिवसांपूर्वी महापौर उपमहापौर यांनी सदर स्पॉट वर भेट दिली होती. भेटीदरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत तात्काळ कचरा हलवण्याच्या आणि पुन्हा येथे संकलन न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणात अशी घाण खपवून घेतली जाणार नाही,” अशा शब्दात सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, लोकप्रतिनिधिंनी पाठ फिरवताच यंत्रणेने केवळ दुसऱ्याच दिवशी पुन्हा घाणीचे साम्राज्य निर्माण करत ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण केली आहे. आज शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी एक वाजता वास्तव पोस्ट ने सदर स्पॉट ला भेट दिली असता हा प्रकार लक्षात आला.
● प्रशासनाचा ढिसाळ कारभार
सदर ठिकाणच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण झाले असून त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी जुमानत नसल्याचे चित्र दिसत असून नेहमी प्रमाणे आदेशाची पायमल्ली होत आहे. “जर महापौरांच्या आदेशाचेच पालन होत नसेल, तर सामान्य जनतेने दाद मागायची कोणाकडे ?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
"शिक्षण मंदिराच्या समोरच कचऱ्याचे आगार असणे हे दुर्दैवी आहे. महापौरांनी आदेश देऊनही जर काही तासातच पुन्हा कचरा टाकला जात असेल, तर ही प्रशासकीय मुजोरी आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे गरजेचे आहे."
एक त्रस्त विद्यार्थी
दरम्यान पुन्हा अशाप्रकारे कचरा हस्तांतरण केला तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दोनच दिवसांपूर्वी देणारे महापौर उपमहापौर आता या प्रकरणावर काय ठोस पाऊल उचलतात आणि आदेश धुडकावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

