जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, एकमेकांना सहकार्य करणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून झाली. स्काऊट गाईड प्रार्थना, सर्व धर्म समभाव प्रार्थना, झेंडा गीत घेऊन सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांची गटानुसार विभागणी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या संघानुसार वाघ, सिंह, मोर, कमळ, गुलाब असे चित्र, नाव व बॅज लावले. गटातील काही विद्यार्थ्यांनी विटांच्या चुली मांडल्या व चुलीवर स्वतः खेळीमेळीच्या वातावरणात स्वयंपाक केला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्य करून स्वतः खिचडी, ठेचा भाकरी, भरीत भाकरी, कढी, पोहे, चहा, पॉपकॉर्न, भेळ तसेच बिन भांड्याचा स्वयंपाक यामध्ये विद्यार्थ्यांनी कच्ची केळी व बटाटे अशा प्रकारचा स्वयंपाक केला.

अशा प्रकारच्या कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांनी एकमेकांशी कसे बोलावे, एकमेकांना सहकार्य करावे. असे गुण जोपासून त्यांच्यात संघ भावना निर्माण झाली. काही विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी तंबू उभारले. तंबू उभारून आपल्या कल्पकतेने तंबूची पाने, फुले, खेळणी, रांगोळी याद्वारे आकर्षक अशी सजावट केली. तर काही विद्यार्थ्यांनी विभागून दिलेल्या आपल्या संघाची सजावट केली.
कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष मा. डॉ. आर. एस. डाकलीया अध्यक्ष म्हणून तर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले. तसेच पोलीस अधीक्षक शशिकांत पाटील, मनोज पाटील व त्यांचे सहकारी यांनी शिबिरास धावती भेट दिली. डॉ. आर.एस. डकलिया व माया अंबटकर तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्याच्या संघाला व तंबूला भेट दिली. यावेळी प्रत्येक संघनायक व उपसंघनायक यांनी सॅल्यूट करून त्यांच्या संघाविषयी माहिती सांगितली. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रतिभा सूर्यवंशी यांनी पुढील शिबिराचे नियोजन सांगितले.

त्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी काही छोटे-मोठे अपघात झाल्यास डॉक्टर लवकर उपलब्ध होऊ शकत नाहीत अशावेळी त्याठिकाणी प्रथमोपचार कसा करावा, स्ट्रेचर कसे बनवावे याबद्दलचे प्रात्यक्षिक स्काऊट मास्तर गिरीश जाधव यांनी करून दाखविले. शिबिरातील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, गाईड मास्टर अलका महाजन, रत्ना चोपडे, स्काऊट मास्टर गिरीश जाधव शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मिळून खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत स्नेह भोजन घेतले.

कडाक्याच्या थंडीत निसर्गाच्या सानिध्यात शेकोटीचा कार्यक्रम घेण्यात आला. शेकोटीच्या उबदार प्रकाशात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यात विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य, नाटिका देशभक्तीपर गीत, शिवगर्जना सादर केले. मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यासोबत कृतीयुक्त शेकोटी गीत सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण झाले. तद्नंतर वंदे मातरम घेऊन शिबिराचा समारोप करण्यात आला.

स्काऊट गाईड शिबिर हे मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सदर शिबिरासाठी स्काऊट मास्टर गिरीश जाधव तर गाईड मास्तर अलका महाजन व रत्ना चोपडे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

कॅम्प खूप छान होता . मला खूप मजा आली.कारण मी भाकरी टाकण शिकून गेली एन्जॉय केला. असच कार्यक्रम महिन्यातून 1 दार झाला पाहिजे .