जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा पारितोषिक वितरण व स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष कमल कुमार पारख, सदस्य सुभाष पाटील, संजय दायमा, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, पालक सदस्य सोनाली चौधरी, ज्योती वाणी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

सुरुवातीस हिवाळी क्रीडा बक्षीस वितरणचा कार्यक्रम संपन्न झाला. यात वैयक्तिक व सांघिक खेळातील विजेत्यांना ट्रॉफी कप व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम आलेल्या योगिता घोलाणे व माध्यमिक शिक्षक गटातून द्वितीय क्रमांक आलेल्या रत्ना चोपडे तसेच माध्यमिक विद्यार्थी गटातून तेजस शुक्ला व रोहित पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे डॉक्टर दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनात खेळांचे महत्त्व किती आहे हे आपल्या अनुभवातून, वेगवेगळे प्रसंग सांगून मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळांविषयी माहिती व आनंद मेळाव्याचे महत्व सांगून मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे खरी कमाई अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास २७ विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये पाणीपुरी, पोहे, इडली चटणी, भेळ, मंच्यूरियन, वडापाव, खमण, पावभाजी, गुलाबजाम, स्वीट कॉर्न भेळ, सँडविच, विविध गेम यासारखे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. आनंद मेळाव्यातील खाद्यपदार्थांचे प्रमुख पाहुणे मान्यवर व सर्व विद्यार्थी शिक्षकांनी मनसोक्त आनंद घेतला. आनंद मेळाव्याच्या स्टॉलचे पदार्थांचे परिक्षण जयश्री ढाके व रत्ना पाटील यांनी केले.

यावेळी स्काऊट मास्टर गिरीश जाधव, सुनील दाभाडे, गाईड कॅप्टन अलका महाजन, रत्ना चोपडे, योगिता घोलाणे यांनी विद्यार्थ्यांना मेळाव्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैशाली साळुंखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


कार्यक्रम संपन्या आधी आम्ही डान्स केला खुप एन्जॉय केला.