जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडूजीचे काम सध्या बाराही महिने सुरु असते, याचे कारण म्हणजे कामाची असलेली गुणवत्ता होय. रस्त्याच्या कामात उपयोगी येणारे यांची विविध प्रकारची अवाढव्य वाहने ही रस्त्याच्या कामापेक्षा रस्त्याच्या दूतर्फा कुठेतरी उभी केलेली दिसून येतात.
महामार्गावर रिंगरोड तसेच भास्कर मार्केटकडून बहिणाबाई उद्यान मार्गे अग्रवाल हॉस्पिटलकडे येतांना असलेल्या तिरकस अंडरपासमुळे नागरिकांचा नेहमीच गोंधळ होतं असतो. त्यात भर म्हणजे याठीकाणी मोठमोठे धोकेदायक खड्डे तयार झालेले आहेत. एखाद्या दुचाकीवर मागे बसलेल्या अंध व्यक्तीसही त्या खड्डयांच्या आकारमानांचा अंदाज येईल, मात्र गेंड्याची कातडी परिधान केलेल्या या निद्रिस्त प्रशासनास रस्त्याची झालेली ही दुरावस्था कधी दिसणार?
अंडरपासखालून मुख्य रस्त्यावर आल्यावर अग्रवाल हॉस्पिटल ते एकलव्य क्रीडा संकूल म्हणजेच शिव कॉलनीच्या दिशेने २० ते २५ मिटर अंतराच्या महामार्गाची भयानक दुरावस्था झालेली आहे. गेल्या महिन्यात दुरुस्तीच्या नावाखाली येथील उंच सखल रस्त्याच्या काही भागाची रोड मिलिंग मशीनच्या साह्याने खरडपट्टी करण्यात आली असून त्या ठिकाणी सुमारे तीन इंच खोलीपर्यंत पृष्ठभाग काढण्यात आल्याने मोठा माग खचल्यागत अवस्था झालेली आहे.

अनेक दिवस पालटून देखील येथे महामार्गाच्या सपाटी करणाचे काम झालेले नाही. आज बुधवार दि.१० डिसेंबर रोजी दुपारी गुजराल पेट्रोलपंप परिसरातील एक जोडपं आपल्या घरी जात असतांना कपारी सारख्या या रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात महिलेच्या दोन्ही पायांना गुडघ्यात मार लागल्याने एका पायास फ्रॅक्चर झाल्याचे कळते.
सदर ठिकाणी दिवसभरात मोटारसायकल घसरून तीन-चार अपघात होत असतात असे अमोल मराठे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी करत जर या ठिकाणी एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला तर कायद्यानुसार ठेकेदार तसेच संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा देखील अमोल मराठे यांनी वास्तवपोस्ट प्रतिनिधी सोबत बोलतांना दिला.
एकुणच गेंड्याची कातडी परिधान केलेल्या या ढीम्म आणि निद्रिस्त प्रशासनास केव्हा जाग येईल… की जाणून बुजून एखाद्या दुचाकी स्वाराचा मृत्यू यांना बघायचा आहे…असा प्रश्न निर्माण होतो.

