Home » महाराष्ट्र » १८०० झाडे तोडून नाशिकचे जळगाव होऊ देणार नाही : जेष्ठ पत्रकार निरंजन टकले

१८०० झाडे तोडून नाशिकचे जळगाव होऊ देणार नाही : जेष्ठ पत्रकार निरंजन टकले

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये साधू- महंतांना सुविधा देण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन तपोवन येथील ५४ एकरवरील १,८२५ वृक्ष तोडण्याच्या तयारी आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. याप्रकरणी मनपाकडे दाखल हरकतीवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी आक्रमक पवित्रा घेत अप्रत्यक्षपणे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना इशाराच दिला आहे. तसेच महापालिकेच्या या निर्णयाविरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची भूमिका पर्यावरणप्रेमींनी मांडली.

यावेळी साधुग्राममधील प्रस्तावित वृक्षतोडीसंदर्भात पंचवटीतील पलुस्कर सभागृहात उद्यान अधिक्षक विवेक भदाणे, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरीशचंद्र, उपअभियंता समीर रकटे, नितीन राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित सुनावणी झाली. महापालिकेकडून सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सभागृहात तसेच बाहेर पोलिसांसह सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तीव्र विरोधामुळे ही सुनावणी चांगलीच वादळी ठरली. दरम्यान, यावेळी उपस्थित पर्यावरणप्रेमी प्रारंभीपासून आकमक झालेले दिसून आले. साधुग्राममधील वृक्षतोड भूमाफीयांसाठी व बांधकाम व्यावसायिकांसाठी सुरु असल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. आजवर एवढे सिंहस्थ झाले. त्यावेळी कधीही झाडे तोडली नाहीत. मग आताच कशासाठी अठारशे खून करण्याचा प्रयत्न होतोय. असा संतप्त सवाल देखील करण्यात आला. एखाद्या सामान्य माणसाने झाड तोडले तर त्यांच्यावर मनूष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. येथे तर तुम्ही अठराशे खून करत आहात. १८०० झाडे तोडून नाशिकचे जळगाव होऊ देणार नाही असा गंभीर इशारा जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी दिला.

दरम्यान जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी प्रशासनासमोर महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांबाबत विचारणा केली. आखाड्यांसाठी असलेल्या दानपत्र जमीनी आहेत मात्र त्या जमीनींवर यांचे लॉन्स आणि मंगलकार्यालये असल्याचे ते म्हणाले. तसेच गेल्यावेळेस अरुंद रस्त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकं मृत्यूमुखी पडले होते. त्या दुर्घटनेला २४ वर्ष झालेत मात्र अद्यापही त्या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही असे सांगत कुंभमेळ्यासाठी जी आवश्यक उपाययोजना झाली पाहिजे होती ती अद्याप झाली नसल्याचे ते म्हणाले.

सुनावणीवेळी माजी नगरसेवक राजेद्र बागुल, राजू देसले, निरंजन टकले, संदीप भानोसे, देवांग जानी, निशीकांत पगारे, रोहन देशपांडे आदींसह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!