दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : राजधानी दिल्लीत आज दि १० सोमवार रोजी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ हाय सिक्युरिटी झोन असलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपासच्या ६ कार, २ रिक्षा, काही मोटरसाइकली देखील पेटल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत ९ व्यक्तींचा मृत्यु झाला असून अनेक जण जखमी झाल्याची विश्वसनीय माहीती मिळाली आहे.

दिल्ली अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका कारमध्ये सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. दरम्यान अग्निशमन दलाच्या सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

स्फोटामुळे मेट्रो स्टेशन गेट नंबर १चे काचेचे तावदाने देखिल तूटले असून यावरून स्फोटाची भीषणता लक्षात येते. सदर घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले असून हा स्फोट पार्किंग मध्ये झाला नसून भर रस्त्यावर लाल किल्ल्यापासून ८०० मीटर अंतरावर झाला. स्फोटामुळे क्षतिग्रस्त कारचे भाग दूर अंतरावर फेकले गेले. सदर घटनेबाबत अद्याप पोलिस विभागाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसून मुंबई आणि यू पी तसेच देशभरातील प्रमुख शहरात हायअलर्ट देण्यात आला असुन NIA व NSG चे पथक घटनास्थळी पोहचले आहे.

