पुणे ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे’चा ६वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एअरोस्पेस टेक्नॉलॉजी’चे उदघाटन व कोनशिला अनावरण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील ११ वर्षांमध्ये भारताने संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात एक नवीन उंची गाठली असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे यामध्ये मोठे योगदान आहे. ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एअरोस्पेस टेक्नॉलॉजी’च्या उदघाटनाद्वारे एका उदयोन्मुख क्षेत्रात नवीन पाऊल ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

देशाला महासत्तेच्या रुपात समोर आणायचे असल्यास देशातील तरुणाईला कौशल्य प्रदान करून कुशल मनुष्यबळात रुपांतरीत करण्याची गरज आहे. मात्र या क्षेत्रासाठी आवश्यक व्यवस्था उभी करणाऱ्या शिक्षण संस्थांची संख्या मर्यादित आहे. सिम्बॉयसिसने शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या. युवकांच्या आशा-आकांक्षाना बळ देणारी व्यवस्था विद्यापीठात उभी केली. विद्यापीठाचे कौशल्य विकासाचे हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरले आहे. यामागे विद्यापीठाचे परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन आहे. येत्या ३ ते ४ वर्षात जगातील अग्रगण्य कौशल्य विकास विद्यापीठात सिम्बॉयसिसची गणना होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार व इतर मान्यवर उपस्थित होते.

