Headlines
Home » क्रीडा » अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल विजेता

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल विजेता

सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या तामिळनाडू संघासोबत अतुल जैन, निशा जैन, प्राचार्य देबासीस दास

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत गुरुवारी अंतिम लढत पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये झाली. एकतर्फी झालेल्या या लढतीत पश्चिम बंगालच्या संघाने केरळवर ८२ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला तिसरे स्थान मिळाले. महाराष्ट्राचा आदर्श गव्हाणे सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला तर ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून केरळच्या नवीन पॉल याची निवड झाली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य तथा जैन इरिगशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. केरळने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु पश्चिम बंगालच्या संघाने जोरदार सुरुवात करत केरळचा निर्णय चुकीचा ठरवला. पश्चिम बंगालने २० षटकांत चार गडी गमावत १६६ धावा केल्या. त्यानंतर १६७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केरळ संघाचे फलंदाज टिकाव धरु शकले नाही. केरळच्या संघाने २० षटकांत ९ गडी गमावून ८४ धावाच करता आल्यात. यामुळे पश्चिम बंगालचा ८२ धावांनी विजय झाला. अंतिम सामन्यात “मॅन ऑफ द मॅच” पुरस्कार दिपन्कन दासगुप्ता (पश्चिम बंगाल) यांना मिळाला.

तामिळनाडूचा पराभव करत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

तिसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि तामिळनाडू या संघात लढत झाली. या लढतीत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत निर्धारित १२ षटकांत दोन गडी गमावून १२३ धावा केल्या. उत्तरात तामिळनाडूचा संघ १२ षटकांत ८ गडी गमावून ९४ धावाच करु शकला. महाराष्ट्राने २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

संपूर्ण स्पर्धेत बेस्ट फिल्डर – तरुण कुमार (तामिळनाडू)
बेस्ट विकेट कीपर – नवीन पॉल (केरळ)
बेस्ट बॉलर – आर्यन सिंग (वेस्ट बंगाल)
बेस्ट बॅट्समन – आदर्श गव्हाणे (महाराष्ट्र)
बेस्ट ऑलराउंडर ऑफ द सिरीज – नवीन पॉल (केरळ)
फेअर प्ले ट्रॉफी – तामिळनाडू संघ
केरळ संघातील सर्व खेळाडूंना रौप्य पदक तर पश्चिम बंगाल संघातील प्रत्येक खेळाडूला सुवर्णपदक देण्यात आले. विजेते व उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अनुभूती निवासी स्कूलमध्ये झालेल्या पारितोषिक समारंभाप्रसंगी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास उपस्थित होते. अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

अतुल जैन यांनी सांगितले की, “या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ प्रदर्शित केला. आपले कौशल्य, गुणवत्ता आणि खऱ्या अर्थाने खिलाडूवृत्ती दाखवली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या” पश्चिम बंगालचे प्रशिक्षक श्रीशेंडू चटर्जी आणि केरळ संघाचे प्रतिनिधी बिलाल शेख यांनीही स्पर्धेबद्दलचे सकारात्मक अनुभव सांगून आयोजकांचे अभिनंदन केले.

अनुभूती स्कूलतर्फे आयोजीत या स्पर्धसाठी जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल,  प्रशिक्षक तन्वीर अहमद, अजित घारगे, योगेश ढोंगडे, मुस्ताक अली, उदय सोनवणे, घनश्याम चौधरी, राहुल निंभोरे, शशांक अत्तरदे, समीर शेख, जयेश बाविस्कर, किशोरसिंग शिसोदिया, प्रविण ठाकरे, मोहम्मद फजल, सैय्यद मोहसिन, अब्दुल मोहसिन, नचिकेत ठाकूर, अमित गंवादे, अनुभूती स्कूलचे विक्रांत जाधव, भिकन खंबायत, विकास बारी, शुभम पाटील, रवी साबळे, गणेश सपकाळे आणि फिजिओथेरॉपिस्ट निकीता वाधवाणी, कीर्ती धनगर यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!