Home » जळगाव » जिल्ह्यात ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ उत्साहात सुरुवात

जिल्ह्यात ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ उत्साहात सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाकांक्षी ‘आदि कर्मयोगी अभियानाची’ सुरुवात उत्साहात झाली. जिल्हा नियोजन सभागृहात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अभियानाचे नुकतेच उद्घाटन झाले.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाशी जोडलेले हे अभियान जळगाव जिल्ह्यातील ११२ आदिवासी गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. याआधी जून-जुलै महिन्यात घेतलेल्या २२१ कॅम्पमधून ६७१ किसान क्रेडिट कार्ड, ३५५१ जातीचे प्रमाणपत्र, ४९९ रेशनकार्ड आणि ३७४६ आधारकार्ड वाटप करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री  यांच्या उपस्थितीत ऑगस्ट २०२५ मध्ये या अभियानाची सुरुवात झाली असून ग्रामस्तरावरील कृती आराखडा २ ऑक्टोबर २०२२५ रोजी ग्रामसभेत मंजूर होणार आहे. हा आराखडा २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबविला जाईल.

अभियानाची वैशिष्ट्ये

शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे, सेवा, समर्पण व संकल्प या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती, योजनांमधील गॅप ओळखून त्यांचे निराकरण करणे, एकात्मिक व सर्वसमावेशक विकास साध्य करणे आदि वैशिष्ट्ये या अभियानाची असणार आहेत.

या अभियानातून देशातील एक लाख आदिवासी गावांमध्ये तब्बल २० लाख आदि कर्मयोगी, आदिसहयोगी आणि आदिसाथी घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका व पंचायत स्तरावर प्रतिसाद गट स्थापन केले जाणार आहेत.

बैठकीत ‘आदि सेवा केंद्र’ या महत्त्वाच्या घटकावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, मास्टर ट्रेनर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!