मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या (MACCIA) शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी MACCIA च्या नूतनीकृत मुख्यालयाचे उदघाटन आणि सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदेचे ई-उदघाटनदेखील करण्यात आले.

देशात अनेक चेंबर ऑफ कॉमर्स/इंडस्ट्री नाव असलेल्या संस्था आहेत. पण कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर असे एकत्रित नाव असलेली ही एकमेव संस्था असून, याच संस्थेच्या माध्यमातून ‘फिक्की’सारख्या संस्थेची निर्मिती झाली. अशा प्रकारे उद्योग व व्यापाराचे भारतीयीकरण करण्याच्या हेतूने १०० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही संस्था आज अतिशय गौरवाने उभी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेठ वालचंदजी यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या कंपन्या आज राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर देशाच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या दोन्ही कंपन्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. मे महिन्याच्या जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात सर्वात पुढे असून ३१हजार कोटींचे संकलन झाले आहे. तसेच पुढील क्रमाने, तिन्ही राज्यांचे एकत्रित जीएसटी संकलन ३५हजार कोटी आहे. महाराष्ट्रात देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के FDI आली असून हा एक ऐतिहासिक विक्रम बनला आहे. महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरू असून, हाफ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केलेले महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. हे सर्व आपल्या सर्वांमुळे शक्य झाले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यावेळी म्हणाले की, केंद्र व राज्यात समान विचारांचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने विविध अनुदानाच्या निधीतून राज्यामध्ये मोठी रक्कम विकासासाठी दिली आहे. यामध्ये पायाभूत विकासासाठी १० लाख कोटी दिले असून केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदान, राजस्व तूट अनुदान (Devolution Grant) याचा उल्लेख करता येईल, असे सांगून राज्यासाठी दिलेल्या विविध निधींची माहिती दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
