जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.

या प्रसंगी आमदार एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संत मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी व भक्तगण उपस्थित होते.

पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. आज आपल्याला संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे सारथ्य करायला मिळाले, पालखी वाहण्याची संधी मिळाली. आज मला ही सेवा मिळणे हे अत्यंत भाग्याचे व गौरवाचे क्षण आहेत.
मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलेली संत मुक्ताबाईंची पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करत असून तापी तिरा पासून चंद्रभागेच्या तिरापर्यंत जाणारी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतराची पालखी आहे. पालखीच्या प्रत्येक टप्यावर प्रशासन सज्ज असून, राज्य सरकार वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
