नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमापार झालेल्या संघर्षादरम्यान जवळच्या शहरांमध्ये छापा टाकण्याचे सायरन वाजल्याने काल पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यातील हंगामातील ५८ वा सामना रद्द करण्यात आल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चे भविष्य आता अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे.
दरम्यान बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने हाणून पाडला. मात्र या हल्ल्याचा परिणाम आयपीएल स्पर्धेवर झाला आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले पाहता खबरदारीचा इशारा म्हणून केंद्र सरकारने बीसीसीआयला सूचना दिल्यानंतर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची आज बैठक पार पडली. या बैठकीत ही स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ५७ सामन्यांचा खेळ पूर्ण झाला आहे. तसेच ५८ वा सामना अर्धवट राहिला आहे.
आतापर्यंत तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. मात्र उर्वरित सामन्यांमुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होईल हे मात्र निश्तित आहे. तर प्लेऑफच्या शर्यतीत एकूण ७ संघ असून त्यांच्यात टॉप-4 साठी लढती सुरु आहेत.
BCCI पुढे आता उर्वरित सामने आयोजनाचे आव्हान
आयपील स्पर्धेतआंतरराष्ट्रीय खेडाळूंचा सहभाग असतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक आणि खेळाडूंची उपलब्धता हे दोन्ही गोष्टींचा ताळमेल बसवावा लागणार आहे. अद्याप आयपीएल मध्ये१७ सामने बाकी आहेत. हे १७ सामने कुठे खेळवायचे याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही. तसेच याच वर्षी भारतात महिला वनडे वर्ल्डकप होणार आहे. तर आशिया कप स्पर्धेचं आयोजनही केले जाणार आहे. त्यामुळे मैदानं आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करावी लागेल.
ही स्पर्धा पुन्हा कधी आयोजित केली जाईल याबाबत अस्पष्टता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू राहणे चांगले वाटत नाही.”
