मुक्ती फाउंडेशनच्या जल जागृती पत्रकाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन
पाळधी ( वास्तव पोस्ट ) : पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून आपण सर्वांनी मिळून जल संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मत जागतिक जल दिनानिमित्त सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे विशेष जल जागृती अभियान पत्रक प्रकाशन करताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडले. यावेळी मुक्ती फाउंडेशनच्या जल जागृती पत्रक प्रकाशन प्रसंगी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, नवलसिंग राजे पाटील, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी. गणेशकर डॉ. मेहुल पटेल, सागर पाटील, वैभव निकुंभ आदी या प्रसंगी उपस्थित होते.
या पत्रकामध्ये आज वाचवलेले पाणी उद्या आपल्याला वाचवू शकते तसेच पाण्याची बचत गरजेची असून पाणी आपले आजोबांनी पाहिले ते खळखळणाऱ्या नदीमध्ये, आपल्या वडिलांनी पाहिले ते तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये, आपण पाहतोय ते छोट्याशा नळामध्ये, आपली मुले पाहतील ते बाटलीमध्ये, नातवंड पाहतील ते कॅप्सूल किंवा चित्रांमधे… म्हणून आपण सर्वांनी जलसंवर्धन केले पाहिजे. आज, उद्या व येणाऱ्या भविष्यासाठी असे आवाहन मुक्ती फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. पालकमंत्री यांनी मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांचे कौतुक केले.
