पाचोरा l वास्तव पोस्ट : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी करत मा. जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर २ लाख रुपयांपर्यंत (मुद्दल व व्याजासह) कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये व पात्र लाभार्थ्यांना स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी गावनिहाय याद्या जाहीर करून त्या ग्रामपंचायत, चावडी, सोसायटी कार्यालय तसेच संबंधित बँकांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात.

तसेच पारदर्शकतेसाठी या याद्या अधिकृत शासकीय संकेतस्थळावरही प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे आभारही व्यक्त करण्यात आले.
निवेदन देताना पदम बापू पाटील, जिल्हापरिषद सदस्य कुरंगी बांबरुड गट, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, विजय पाटील (चेअरमन, विकास सोसायटी वेरूळी), हेमराज पाटील (माजी सरपंच, मोहाडी), संतोष पाटील (शेतकरी), राजू चौधरी (शेतकरी) तसेच रोहित पाटील (माजी सरपंच आसनखेडा) उपस्थित होते

