Headlines
Home » होम » लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन पूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न !

लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन पूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न !

Mukhyamantri Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता येत्या रक्षाबंधनाला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी १७ ऑगस्टला सरकारच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात येणार असून योजनेस पात्र महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता वितरीत केला जाणार आहे.

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यावर मागील दोन महिने विरोधकां कडून या योजनेवर आरोपप्रत्यारोप होवू लागले. तसेच अर्ज भरताना अनेक महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र राज्य सरकारने प्रत्येक महिलेपर्यंत योजना पोहचविण्यास सर्वोतर प्रयत्न केले, आणि फक्त दोन महिन्यात राज्यातील एक कोटी ३९ लाख ९४ हजार ३४५ महिलांचे अर्ज या योजनेसाठी आलेत.

योजनेच्या सुरवातीस येणाऱ्या अडचणी, अटी सरकारने कमी करत महिलांना आणखी सोप्या पद्धतीने सहज फॉर्म भरता येतील अशा सोई उपलब्ध करुन दिल्या. सदर योजनेकरीता ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे. दरम्यान आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत नोंदणी केलेल्या बहि‍णींना यंदा रक्षाबंधनच्या आधीच सरकारकडून जणूकाही ओवाळणीच मिळणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता पात्र महिलांना १७ ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी १७ ऑगस्टला सरकारच्या वतीने एक मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन हजर राहतील. सदर योजनेचा पहिल्या हफ्ताच्या स्वरुपात ३,००० रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात येतील. एक ते दोन कोटी महिलांना पहिला हफ्ता वाटप करण्यात येईल.

दरम्यान राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी ३९ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी अर्ज हे मुंबई शहर, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशिम, रत्नागिरी, गडचिरोली, धाराशिव या जिल्ह्यांमधून आल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!