जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
राज्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाने आता रौद्र रूप धारण केले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) तयार केलेल्या ताज्या अहवालानुसार, जिल्ह्यातील तब्बल १००४ शिक्षकांची नावे संशयास्पद आढळली असून, ही यादी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, पुढील तपासात हा आकडा तिपटीने वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बड्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनी नियुक्ती
तपास अहवालात नमूद केल्यानुसार, या शिक्षकांची नियुक्ती तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्यांनी आणि शेऱ्याने झाली होती. मात्र, या नियुक्त्या पूर्णपणे ‘सदोष’ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, तक्रारदार असलेले भाऊसाहेब चव्हाण यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
अहवालातील धक्कादायक खुलासे:
१. नोंदींमध्ये तफावत: शालार्थ आदेशातील कर्मचाऱ्यांची नावे, शाळेची माहिती आणि आदेश क्रमांक यांचा सरकारी दप्तरातील नोंदींशी कोणताही मेळ लागत नाही.
२. अपूर्ण कागदपत्रे: अनेक ठिकाणी नियुक्ती प्रक्रियेची माहिती अपूर्ण असतानाही आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
३. संस्थाचालकही रडारवर: या घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ३५ पेक्षा अधिक शिक्षण संस्थांचा समावेश असून, जिल्हा परिषदेसह महानगरपालिकेचे अनेक अधिकारी आणि संस्थाचालक तपासाच्या फेऱ्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथून होणार पडताळणी
काही प्रकरणांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालकांकडून कागदपत्रांची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालार्थ ड्राफ्ट, नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष शैक्षणिक कागदपत्रे यांची पडताळणी केली जात असून, अनेक ठिकाणी मूळ नोंदी आणि सादर केलेली कागदपत्रे यात मोठी तफावत आढळली आहे.
कारवाईची टांगती तलवार:
एसआयटीच्या (SIT) या अहवालामुळे जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दोषी आढळणाऱ्या शिक्षकांवर केवळ निलंबनाचीच नाही, तर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडून आतापर्यंतच्या वेतनाची वसुली होण्याची दाट शक्यता आहे.

