वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क | विशेष बातमी
नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरेलू एलपीजी सिलेंडर वितरणाच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आता पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कनेक्शन असलेल्या घरांना घरेलू एलपीजी सिलेंडर मिळणार नाहीत, नवीन कनेक्शन घेता येणार नाही आणि रिफिलिंगसाठीही परवानगी मिळणार नाही. ज्यांच्याकडे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागेल.
हा बदल आवश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत एलपीजी (पुरवठा आणि वितरण) नियमन आदेश, २००० मध्ये सुधारणा करून आणला आहे. बदल १४ मार्च २०२६ रोजी भारत सरकारच्या राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झालेल्या अधिसूचनेच्या तारखेपासून लागू झाला आहे. या आदेशास ‘द्रवीकृत पेट्रोलियम वायू (पुरवठा आणि वितरणाचे विनियमन) सुधारणा आदेश, २०२६’ असे संबोधले जाईल.
राजपत्रातील मुख्य तरतुदी (S.O. १३३३(E)):
• पीएनजी कनेक्शन असलेला कोणताही व्यक्ती घरेलू एलपीजी कनेक्शन ठेवू शकणार नाही किंवा सरकारी तेल कंपन्या/वितरकांकडून रिफिल घेऊ शकणार नाही.
• अशा व्यक्तींना एलपीजी कनेक्शन तात्काळ सरेंडर करणे बंधनकारक आहे.
• राजपत्रातील मुद्दा क्र. २ (६) नुसार, ज्याच्याकडे पीएनजी आहे, त्याला ‘एलपीजी मिळणार नाही’ असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आधीची सुविधा पूर्णपणे बंद केल्याशिवाय नवीन सुविधा मिळणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. (संदर्भ: भारत सरकारचा राजपत्र, १४ मार्च २०२६ आणि PIB अधिसूचना)
मंत्रालयाने हे पाऊल एलपीजी पुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि एकाच घरात दोन प्रकारच्या गॅस सुविधा टाळण्यासाठी उचलले आहे. सध्या पश्चिम आशिया (वेस्ट एशिया) युद्ध आणि आयात संकटाच्या पार्श्वभूमीवर एलपीजीची मागणी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विविध माध्यमांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
कोणाला लागू?
• फक्त घरेलू (Domestic) एलपीजी कनेक्शनधारकांना.
• व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरकर्त्यांना याचा थेट परिणाम नाही.
• पीएनजी नसलेल्या घरांना पूर्वीप्रमाणे एलपीजी उपलब्ध राहील.
सरकारचे आवाहन:
पीएनजी कनेक्शन असलेल्या ग्राहकांनी आपले एलपीजी कनेक्शन तात्काळ सरेंडर करावे. सरेंडर प्रक्रिया जवळच्या एलपीजी डिस्ट्रीब्यूटर किंवा ऑनलाइन पोर्टलवरून पूर्ण करता येईल.

