जळगाव कोगटा किंग्स विरुद्ध अमळनेर सुहान्स जायंट्स आमनेसामने
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
जळगाव क्रिकेट लीग (JCL T20) आता आपल्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. साखळी फेरीतील अव्वल दोन संघ, जळगाव कोगटा किंग्स आणि अमळनेर सुहान्स जायंट्स यांच्यात आज, २४ एप्रिल रोजी ‘क्वालिफायर-१’ चा हाय-व्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत (Final) धडक मारणार असल्याने क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दोन संधींचा फायदा
नियमांनुसार, साखळी फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या या दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, त्याला थेट फायनलचे तिकीट मिळेल. मात्र, पराभूत होणाऱ्या संघाला खचून जाण्याचे कारण नाही; त्यांना ‘क्वालिफायर-२’ मध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल.
साखळी फेरीअखेरची स्थिती
| अ.क्र. | संघ | सामने | विजय | पराभव | गुण | रनरेट |
|---|---|---|---|---|---|---|
| १ | जळगाव कोगटा किंग्स (Q) | ५ | ४ | १ | ८ | २.२२२ |
| २ | अमळनेर सुहान्स जायंट्स (Q) | ५ | ३ | २ | ६ | १.१६१ |
| ३ | जामनेर सातपुडा हिरोज (Q) | ५ | ३ | २ | ६ | ०.३९५ |
| ४ | चाळीसगाव SPCC चॅलेंजर्स (Q) | ५ | ३ | २ | ६ | -०.२७५ |
| ५ | रावेर रॉयल्स | ५ | १ | ४ | २ | -१.५१४ |
| ६ | पाचोरा SKT योद्धा | ५ | १ | ४ | २ | -१.९८१ |
साखळी फेरीत पाच सामने खेळल्यानंतर ४ विजय मिळवून जळगाव कोगटा किंग्सने दिमाखात अव्वल स्थान गाठले. त्यांच्यापाठोपाठ अमळनेर सुहान्स जायंट्स, जामनेर सातपुडा हिरोज आणि चाळीसगाव SPCC चॅलेंजर्स या तीनही संघांचे प्रत्येकी ६ गुण झाले आहेत. मात्र, निव्वळ धावगतीच्या (Net Run Rate) आधारावर अमळनेर दुसऱ्या, जामनेर तिसऱ्या आणि चाळीसगाव चौथ्या क्रमांकावर राहिले आहे.
बाद फेरीचे समीकरण
गुणतालिकेतील अव्वल चारही संघांनी (Q) अधिकृतपणे प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता सिद्ध केली आहे. दुसरीकडे, रावेर रॉयल्स आणि पाचोरा SKT योद्धा या संघांना पाचपैकी केवळ एकच विजय मिळवता आल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आले आहे.
‘क्वालिफायर-१’ चा हाय-व्होल्टेज सामना सुरु

कोगटा किंग्सने साखळी फेरीत ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे, तर अमळनेर सुहान्स जायंट्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ फॉर्मात असल्याने जैन क्रिकेट मैदानावर आज धावांचा पाऊस पडणार की गोलंदाजांची फिरकी चालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “आज ठरणार… कोण थेट फायनल गाठणार!” अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दरम्यान शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा अमळनेर सुहान्स जायंट्सने नाणेफेक जिंकून जळगाव कोगटा किंग्सला फलंदाजीस पाचारण केले. मिळालेल्या या संधीचा फायदा उचलत कोगटा किंग्सकडून सलामीवीर ओम भोसलेने मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. त्याने केवळ ७४ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद १७० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर जळगावने निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून २४२ धावांचे महाकाय आव्हान अमळनेरसमोर ठेवले आहे.
हे आव्हान अमळनेर यशस्वीपणे पेलून थेट फायनलमध्ये धडक मारणार की जळगावचे गोलंदाज या धावसंख्येचा बचाव करून आपल्या संघाला अंतिम फेरीत नेणार, याकडे सर्व जळगावकर क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.
आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर पराभूत होणाऱ्या संघाला ‘क्वालिफायर-२’ मध्ये पुनरागमन करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
