चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या काळात येथील विद्यार्थी निश्चितच विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करतील.

यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्राचे आंचलिक प्रबंधक प्रवीण कुमार सिंह, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विशेष अधिकारी राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापिका सोनाली महाजन, गृहपाल लक्ष्मीकांत कोठावदे यांसह पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका सोनाली महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र कुमावत यांनी केले.
