जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे दर्जेदार शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शासनाने शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व अधिकाऱ्यांना शाळा भेटी सक्तीच्या करण्यात आलेल्या असून सर्व अधिकारी नियमित शाळा भेटी करत आहेत.
प्रत्येक शनिवारी शिक्षण आयुक्तांपासून तर थेट केंद्रप्रमुखांपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्यांना शाळा भेटीचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून त्यांनी केलेली शाळा भेट माहिती गुगल लिंक वर भरण्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेले आहेत.

आज दि १फेब्रुवारी २०२५ रोजी, जि.प. उच्च प्राथमिक शाळा गाडेगाव, ता.जामनेर येथे शिक्षणाधिकारी विकास पाटील (प्राथमिक) जि.प. जळगाव यांनी सकाळी साडेसात वाजता शाळेला भेट दिली तेव्हा प्रार्थना सुरू होती. त्यांनी परिपाठाचे निरीक्षण करून मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कवायतीचे निरीक्षण करून स्वतः ढोल वाजवून कवायतीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
यानंतर आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे बॉटल गेम आणि स्पेलिंग क्विझ यात स्वतः सहभाग नोंदवून खेळामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले. यानंतर प्रत्यक्ष वर्ग भेटीद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करून मार्गदर्शन केले तसेच शिक्षकांना देखील मार्गदर्शन करून योग्य त्या प्रशासकीय सूचना केल्या.
