Headlines
Home » जळगाव » योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या योग विषयक ग्रंथाचे प्रकाशन

योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या योग विषयक ग्रंथाचे प्रकाशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांच्या योगविषयक ग्रंथाचे मान्यवरांच्या  उपस्थितीत प्रकाशन झाले. डॉ. देवानंद सोनार यांनी लिहिलेल्या ‘हठप्रदीपिका : योगांग परिचय प्रचलित विधींसह’ या ग्रंथामध्ये स्वामी स्वात्माराम यांनी संस्कृत भाषेमधून श्लोकबद्ध केलेल्या हठप्रदीपिका या ग्रंथाचे प्रचलित विधिंसह वर्णन केलेले आहे.

मू.जे. महाविद्यालयात सोहम डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय योग परिषदेमध्ये या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर (महासचिव बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती), मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  संजय ना. भारंबे, प्राचार्य डॉ.  निलेश वाघ (योग महाविद्यालय, नाशिक), ॲड. प्रवीणचंद्र जंगले (सहसचिव- के.सी.ई. सोसायटी) उपप्राचार्य डॉ.देवेंद्र इंगळे आणि ग्रंथाचे लेखक डॉ.देवानंद सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रंथाविषयीची भूमिका व्यक्त करताना डॉ.देवानंद सोनार म्हणाले की, हा ग्रंथ योग साधक, योग शिक्षक आणि योग शिक्षणामध्ये पदविका, पदवी,  पदव्यूत्तर शिक्षण, नेट आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

पाच प्रकरणे असलेल्या या ग्रंथामध्ये योगाभ्यास पूर्वतयारीचे तसेच विविध सिद्धांतांचे आणि योगासनांचे वर्णन पहिल्या प्रकरणात करण्यात आले आहे. दुसऱ्या प्राणायाम प्रकरणांमध्ये शरीराच्या आंतरिक शुद्धीकरणासाठी षटकर्म आणि प्राणायामाचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. तृतीय प्रकरणामध्ये शरीर, मनाच्या स्थिरतेसाठी आणि कुंडलिनी जागृतीच्या उद्देशाने मुद्रा आणि बंध यांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. चौथ्या प्रकरणामध्ये समाधी प्राप्तीच्या उद्देशाने नादानुसंधानाच्या प्रक्रियेचे वर्णन विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. शेवटच्या पाचव्या प्रकरणात योगाभ्यास करताना काही व्याधी उद्भवल्यास त्यावर उपाययोजना कशी करावी यासंबंधीचे औषधी कथन करण्यात आलेले आहे.

प्राचीन ग्रंथातील श्लोक आणि प्रचारांमध्ये केल्या जाणाऱ्या योगीक प्रक्रियांच्या विधी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये केलेले आहे.
अथर्व पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित या ग्रंथाला प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे (अध्यक्ष, के. सी. ई. सोसायटी) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उपस्थित सर्वांनी या ग्रंथाचे स्वागत आणि ग्रंथाचे लेखक योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!